शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६
गावशिवारांमधूून मराठे फुलंब्रीत एकवटले
फुलंब्री /
सकल मराठा समाजाचा निःशब्द मोर्चा शुक्रवारी फुलंब्रीकरांनी अनुभवला. लाखोंच्या या अभूतपूर्व मोर्चात महिलांची व तरुणांची संख्या लक्षणीय होती. फुलंब्री शहर पूर्णपणे गजबजून गेले. या मोर्चामुळे ग्रामीण भागातदेखील सर्वत्र शुकशुकाट होता.
फुलंब्री तालुक्यात 93 गावे आहेत. मात्र, मोर्चाचे स्वरूप पाहिले तर गावेच्यागावे या मोर्चात सामील झाल्याचे दिसत होते. देवगिरी साखर कारखान्यासमोरील प्रांगणातून मोर्चास सुरुवात झाली. सिल्लोड रोडवरील खांडसरी कारखाना प्रांगणात मोर्चाचा समारोप झाला. हे अंतर चार किलोमीटर होते. वाहनांची तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था होती.
ध्वनिक्षेपण व वॉकी-टॉकीचा वापर झाल्याने मोर्चाचे नियोजन शिस्तीत झाले.दोन हजार स्वयंसेवक एकाच पोशाखात होते. पोलीस यंत्रणेतर्फे 70 अधिकारी व 300 पोलीस नेमलेले होते. मोर्चा मार्गावर स्वयंसेवी संस्थांनी पाणी व फराळाची व्यवस्था केली. मुस्लिम समाजाने केळी व पाणी, धनगर समाजाने चहा उपलब्ध करून दिला होता. बाजारपेठ बंद होती तरी व्यवस्थेमुळे मोर्चेकर्यांना अडचण भासली नाही. सकाळपासूनच बाजारपेठ बंद असल्यामुळे सर्वाना मोर्चातसहभागी होता आले. रस्त्याच्या एकाबाजूने मोर्चा व दुसर्या बाजूने वाहतूक अशी पोलिसांची आखणी होती.
वकिलांसह वारकरी आपल्या वेशभूषेत मोर्चात सामील होते. मोर्चा मार्गावरील महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. वैद्यकीय सेवेसह आठ रुग्णवाहिका सेवेत होत्या. मोर्चात कुठलीही घोषणाबाजी झाली नाही. गर्दीमुळे औरंगाबाद-जळगाव हमरस्ता पूर्णपणे बंद ठेवावा लागला.
या मोर्चात सर्व पक्षाचे माजी, आजी आमदार व मंत्री सहभागी झालेले होते. समारोपवेळी पाच विद्यार्थिनींनी निवेदनाचे वाचन केले तहसीलदार संगीता चव्हाण यांनी हे निवेदन व्यासपीठावर जाऊन स्वीकारले. कोपर्डी अत्याचार व हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजास आरक्षण द्यावे.अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवून कायद्यात दुरुस्ती करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यांसह दहा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा